- मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना तीन लाखांची आर्थिक मदत जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे सोमवारी सायंकाळी होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत शोभा विजय टाक (वय ५० वर्षे रा. पारशी चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ), वर्षा विलास केदारी (वय ५० वर्षे रा. गांधीनगर, देहुरोड), राम अवध प्रल्हाद आत्मज (वय- २९ वर्षे रा. पिपारा सोहत, लक्ष्मीपुरी रेंज महाराजगंज उत्तरप्रदेश), भारती नितीन मंचल (वय ३३ वर्षे रा. शितळादेवी मंदीरा जवळ, मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय ४५ वर्षे रा. थॉमस कॉलनी, देहुरोड) यांचा मृत्यू झाला आहे.
दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोणत्याही स्वरुपाची परवानगी तसेच कायदेशीर बाबींची पुर्तता केली नाही. याप्रकरणी नामदेव बारकु म्हसुडगे (जागा मालक), दत्ता गुलाब तरस (होर्डिंग बनविणारा), महेश तानाजी गाडे (होर्डिंग भाडयाने घेणारा), जाहीरात करणारी कंपनी व इतर संबंधितांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात १८५/२०२३ मा द.वी. कलम ३०४ (२), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















