- प्रशासनाकडे बीआरटी बसची कमतरता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- आळंदी ते दिघी पालखीमार्गावरील बीआरटी मार्गाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. तरी हा मार्ग उद्घाटनाच्या हा प्रतीक्षेत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बीआरटी मार्गावर अद्याप एकही बस धावली नाही. या मार्गावर नॉन बीआरटी बसच्या फेऱ्या होत असून जोपर्यंत प्रशासनाकडे बीआरटी बस उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेच्या हदीत येणाऱ्या या पालखीमार्गाचे काम महापालिकेने चार टप्प्यांत पूर्ण केले. साठ मीटरचा विस्तीर्ण रस्ता तयार करून या मार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रैक, सेवा रस्ता, बीआरटीएस मार्ग, वृक्षारोपण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये सोय करण्यात आली आहे. नॉन बीआरटी बसच्या वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या मधोमध केलेला बीआरटीएस मार्गावर एकही बस अद्याप धावली नाही. या बीआरटीएस मागांचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी ६ कि. मी. असून चऱ्होली ते दिघीतील मॅगझीन चौक या ६० मीटर रुंदी असलेल्या मार्गावर एकूण ९ बसथांबे असणार आहेत. तर दत्तनगरपासून जकात नाक्यापर्यंत या मार्गाची रूंदी ३० मीटर आहे.
या रस्त्यावर ६ बसथांबे प्रस्तावित असून, तीन येण्याकरिता व तीन जाण्याकरिता असणार आहेत. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वर्षभरात बीआरटीएस मार्गावर बस धावण्याचे नियोजन केले होते. मात्र, नंतर उद्भवलेली करोनाची परिस्थिती यामुळे प्रशासनाने केलेले नियोजन फसले. आता करोनाची परिस्थिती निवळली असली तरी या मार्गावर बीआरटी बसची गरज भासणार आहे. बीआरटी प्रशासनाकडून याबाबत नियोजन सुरू असून बस उपलब्ध झाल्यावर उद्घाटनाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे.
प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा याकरिता पीएमपी प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गावर बीआरटी सुरू केले. मात्र, बीआरटीच सुरु होण्याचा प्रवास मंद झाला आहे. वर्षापासून ही बीआरटी सुरू झाली नाही. या मार्गाजवळील रस्त्यावरून दिवसभरात १४४ बसच्या माध्यमातून १६०० फेऱ्या होतात. मात्र, हा मार्ग गेल्या वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हा पीएमपीचा आठवा बीआरटी मार्ग आहे. हा बीआरटी मार्ग वापरात आला तर किमान गर्दीच्या वेळी किमान १० मिनिटे सामान्य वेळी पाच ते सात मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
दिघी-आळंदी बीआरटी मार्गाची बीआरटी बस चालवून चाचणी घेतली आहे. बीआरटी प्रमुख अनंत वाघमारे, अधिकारी वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी यशस्वी झाली आहे. आता प्रशासनाकडून आदेश आल्यावर लवकरच उद्घाटनाचा मुहूर्त ठरणार आहे. आतापर्यंत या मार्गावर नॉन बीआरटी बस धावत आहेत. बीआरटी बस संख्या कमी आहेत. बीआरटी बस उपलब्ध झाल्यावर त्या मार्गावर सोडण्यात येतील.
– विजयकुमार मेदगे, भोसरी आगार प्रमुख…


















