- रुग्णावर करा हे प्रथमोपचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२३) :- मार्च ते जून या कालावधीत दरवर्षी राज्यात उष्णतेमुळे विविध प्रकारचे आजार आढळून येतात. सद्यस्थितीत राज्यभरात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असले कारणाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना आवाहन केले आहे.
पुरेसे पाणी प्या. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी, थेट येणाऱ्या सूर्यप्रकाश व उन्हापासून स्वतःचे संरक्षण करावे, दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. उन्हात खेळू नये. लहान मुलांना आत ठेऊन गाडी बंद करू नये. उन्हात शारीरिक कष्टाची कामे करू नयेत. दुपारी ४ या वेळेत स्वयंपाक करू नये चप्पल न घालता/अनवाणी उन्हात चालू नये. मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे.
उष्णतेच्या लाटेतील आजाराची लक्षणे :-
चक्कर येऊन पडणे
फेफरे येणे/झटके येणे
झोपेतून उठण्यास त्रास होणे/ उठता न येणे
गोंधळल्यासारखे बोलणे/वागणे
श्वासाची व ह्रदयाच्या ठोक्याची गती वाढणे
शरीराचे तापमान १०५F(४०.५ C) पेक्षा अधिक होणे
स्नायूंत पेटके येणे, चिडचिड होणे, डोकेदुखी.
अशक्तपणा येणे, मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे.
उष्माघाटाचा त्रास उद्भवल्यास लगेचच नजीकच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका दवाखाना/ रुग्णालयात उपचार घ्यावेत. परंतु व्यक्तीस रुग्णालयात त्वरित घेऊन जाणे शक्य नसल्यास खालील प्रथमोपचार करावेत
पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेऊन आडवे पडायला सांगावे.
त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात/सावलीत आणावे.
व्यक्ती जागी असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावेत.
हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा. संवेदनशील राहून त्यांचे कपडे ढिले करावेत.
नळाच्या पाण्याच्या सुती कपड्याच्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात
उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे जेणेकरून व्यक्ती गुदमरून जाणार नाही
व्यक्ती बेशुद्ध असल्यास त्यांना खायला/प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये उष्माघात आजारासंबंधी औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी.
















