न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रातील सत्ता गेल्यास नरेंद्र मोदीही तुरुंगात जाण्याची शक्यता असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पिंपरीत वडार समाजाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राजकारणातील चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडत आहेत. पण, त्यांचे पकडणे मी गैर मानतो. कारण, पकडल्यावर ती प्रकरणे पूर्ण न होता, तीन ते चार वर्षे कारागृहात ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. हे मानसिकतेवर आघात करण्याचे धोरण आहे. कर्नाटक, केंद्रातील सत्ता गेल्यास नरेंद्र मोदीही तुरुंगात जाऊ शकतात. जे पेरलेले असते, तेच उगवते. त्यामुळे मोदी यांनी जे पेरले, तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होण्यासारखी परिस्थिती मला दिसत आहे.”
यावेळी त्यांनी अजित पवार भाजपमध्ये जाणार का या चर्चांवर देखील भाष्य केले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दोनवेळा भाजपमध्ये जातो असे वातावरण निर्माण केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली. ते दोन्हीवेळा बोलले आणि त्यांनी दोन्हीवेळा घुमजाव केले. देशभरात उरलेले सर्वजण घाबरत असले तरी अजित पवारांनी या दोघांनाही फसवले, कोणाला कधी, कुठे मुख्यमंत्रिपद चिकटेल त्यावर अजित पवार भाजपमध्ये जातील की नाही हे अवलंबून असेल,” असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वडार समाजाला मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. भटक्या विमुक्तांमध्ये वडार समाज हा ४० टक्के आहे. वडार समाजाची अवस्था ही खालवलेली असल्याने शासनाने या समाजाला इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी मदत करावी. शिक्षणाच्या संधीबरोबरच कला जोपासणाऱ्या समाजाला अनुदानाच्या रुपाने मदत केली पाहिजे, असेही डॉ. आंबेडकर यांनी शासनाला आवाहन केले.
















