- इंजेक्शनबाबत पोलिसांचा हा आहे सावधानतेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीला खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी अटक केली आहे.
रवि चंद्रकांत थापा (वय ३२ वर्षे, रा. सर्व्हे नं. १०३, नेहरुनगर, अॅटलॉस कॉलनी जवळ, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे (दि. १७) रोजी स्टाफसह वाकड, सांगवी भागात पेट्रोलिंग करुन, पिंपरीतील वायसीएम हॉस्पीटल समोर, फाऊंटन चायनिज जवळ आले. त्यावेळेस फाऊंटन चायनिज समोर एक इसम त्याच्या हातामध्ये एक सफेद रंगाची पिशवी घेवुन काव-या बाव-या नजरेने इकडे तिकडे पहात संशयीतरीत्या थांबलेला दिसला. त्यावेळी हा इसम सरकारी वाहन पाहुन घाबरुन गडबडीत पिशवीसह पळुन जावु लागला, त्याचा संशय आल्याने, सपोनि खाडे यांनी स्टाफसह त्याचा पाठलाग केला. थोडयाच अंतरावरून त्याला पकडले.
पोलीसांनी त्याला सफेद रंगाच्या पिशवीमध्ये काय आहे ? तसेच सरकारी गाडी पाहुन गडबडीत का पळुन जात होता? असे विचारले. त्याने पिशवीमध्ये गांजा हा अंमली पदार्थ व मेफेनटरमाईन इंजेक्शन असल्याचे सांगीतले. त्यामुळे अन्न औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधुन औषध निरीक्षक यांना बोलावुन त्याची झडती घेतली. त्याच्या ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये १६,०५० रुपये किंमतीचा ६४२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, २५,४६० रु किंमतीच्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP इंजेक्शनच्या ९५ पॅकबंद बाटल्या व रोख २,००० रुपये असा एकुण ४३,५१० रुपये किंमतीचा माल जप्त करुन, त्याचे विरुध्द पिंपरी पोलीस ठाणे गुरनं. ५४१ / २०२३ भादवि कलम २७६,३३६.३२८ व एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशन हे करत आहे.
सावधानतेचा इशारा : –
MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP हे औषध जास्त करून कॉलेजची मुले जिम मध्ये जास्त वेळ व्यायाम व्हावा व शरीर चांगले दिसावे तसेच सेक्स पावर वाढावी यासाठी करतात अशी माहिती मिळाली आहे. परंतु सदरचे औषध घेण्याचे दुरगामी परिनाम होतात असे औषध निरीक्षक यांचे मत आहे. त्यामुळे असे औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रीपशन शिवाय घेवू नये असे अहवान पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, विजय नलगे, किरण काटकर, सुनिल कानगुडे व प्रदीप गुट्टे यांनी केली आहे.












