- या तारखेपर्यंत इतक्या रुपयांपर्यंतच नागरिकांना बदलता येणार नोटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे. ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.
२०१६ साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर ५०० आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली. २०१८-१९ सालीच आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. मार्च २०१७ पर्यंत दोन हजार रुपयांच्या ८९ टक्के नोटा चलनात होत्या, ३१ मार्च २०१८ ला ज्याची एकूण किंमत ६.७३ लाख कोटी रुपये होती. ३१ मार्च २०२३ ला हीच रक्कम ३.६२ लाख कोटी एवढी झाली, जी १०.८ टक्के होती.
२३ मे २०२३ पासून नागरिकांना बँकेमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. एकावेळी नागरिकांना २० हजार रुपयांपर्यंतच्याच २ हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. तसंच बँकांनी आतापासूनच २ हजार रुपयांच्या नोटा देणं बंद करावं, असे आदेशही आरबीआयने केले आहेत.