- नागरिकांना ऑनलाईन अभिप्राय सादर करण्याचे आरटीओकडून आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- ओला, उबेर सारख्या अॅपवर आधारित वाहनांसाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यावर नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानुसार या वाहनांची नियमावली करण्यासाठी सूचना, अभिप्राय पाठविण्याचे आवाहन पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. आरटीओच्या ई-मेल आयडीवर अथवा मोशी येथील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन या सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या आलेल्या सूचनांनुसार या वाहनांसाठी समितीद्वारे नियमावली करण्यात येणार आहे.
ओला, उबेर या अॅपवर आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात सातत्याने नागरिकांच्या तक्रारी होतात. त्यांच्यासाठी काही तरी नियमावली तयार करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नियमावलीचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून या वाहनांसाठी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर खुल्या करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांबाबत नागरिकांच्या सूचना, अभिप्राय मागणविण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडीवर अथवा मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या आलेल्या या सुचनांनुसार पुढील नियमांची कार्यवाही करण्यात येणार आहे.
“महाराष्ट्र मोटार वाहन समुचयक नियमावलीचा मसुदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात जनतेचे मत, अभिप्राय मागविण्याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले होते. याला नागरिकांनी अधिकाधिक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. – अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…