- जनसंवाद सभेत नागरिकांच्या समस्या नेहमीच्याच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या प्रत्येक महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी,सूचना जनसंवाद सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिका-यांनी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ४१ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ८, ४, ०, ६, २, ३, १३ आणि ५ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे,उमेश ढाकणे उपस्थित होते.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पावसाळ्या आधी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्यात यावी तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यांची साफसफाई करण्याबाबत, पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. नादुरुस्त पदपथ दिवे दुरुस्त करण्यात यावे, पाणी गळती बाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.