न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- चिखलीगांव कमानीशेजारी कृष्णा ऊर्फ सोन्या तापकिर याचा दुचाकी वरून आलेल्या दोघांनी (दि. २२) भरदिवसा फायरिंग करुन खुन करीत पलायन केले होते. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. ३४६/२०२३ भादवि कलम ३०२. १२०(ब) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५). (२७) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या तपासासाठी तात्काळ आरोपींना शोधुन ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते. गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान गुन्हा घडल्यापासुनच वेगवेगळी दोन पथके चिखली, पुनावळे, मोईगांव, यवत, ता. दौड, सुपा, ता बारामती या भागात रवाना केली होती. आरोपीचा शोध घेत असताना गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे उपलब्ध झालेल्या माहितीवरुन खुनाच्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी हे सरताळा, ता. जावळी, जि. सातारा या परिसरामध्ये असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांचे दोन पथके शासकीय व खाजगी वाहनाने सरताळा, ता. जावळी, जि.सातारा येथे गेले. तेथील आसपासचे परिसरात आरोपीचा शोध घेत असताना कॅनलच्या लगत असलेल्या राज इंडियन व्हेज नॉनवेज हॉटेलच्या जवळ नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी हे त्याचे जवळील के.टी.एम दुचाकी गाडीवरुन येताना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत असताना ते पळुन जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सौरभ ऊर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे (वय २३ वर्षे, रा. शिव अॅक्वा प्लॅटचे समोर, फलकेवस्ती, मोईगांव, ता. खेड, जि. पुणे) असे असुन त्याचा साथीदार विधीसंघर्षित बालक आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी व साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अमंलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव | जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांनी केली आहे.