न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२३) :- उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर सायन्स पार्क, तारांगणमध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सायंकाळी साडेसहापर्यंत वेळ वाढविण्यात आली असून, ते सोमवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. याचबरोबर उन्हाळी सुटीमध्ये खगोल विज्ञान, भौतिक, रसायन व जीवशास्त्र या विषयांवर मनोरंजक विज्ञान शिबिरांचेही आयोजन केले आहे. विज्ञानाचा वारसा जपणाऱ्या या वारसास्थळाला प्रत्येक पालक पाल्यासोबत आवर्जून भेट देत आहे.
तारांगणमध्ये दररोज सहा खेळ होत आहेत. पहिला खेळ सकाळी ११ वाजता सुरू होतो. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमधून हे खेळ दाखविले जातात. सध्या उन्हाळी सुटी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतील मुले तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दोन ते १२ वर्षांपर्यंत मुलांसाठी तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी ८० रुपये, २० जणांच्या १२ वर्षांपुढील मुलांसाठी १४० रुपये, इतर नागरिकांसाठी सायन्स पार्कला ६०, मुलांसाठी ३०, तर तारांगणसाठी १०० आणि मुलांसाठी ८० रुपये तिकीट दर आहे.
सायन्स पार्क, तारांगणला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसाला पाचशेहून अधिक नागरिक प्रकल्पांना भेट देत आहेत. तीनही भाषांमध्ये तारांगणमधील आकाशगंगेचा शो दाखविला जातो. खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सूर्यमालिकेची माहिती होत आहे. दिवसा तारे पाहणे ही बोलण्यातील कल्पना तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली, अशी माहिती प्रवीण तुपे, संचालक, सायन्स पार्क यांनी दिली.












