- विचारणा केल्यावर तेथील कामगारांकडून ग्राहकाची यथेच्छ धुलाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२३) :- महिंद्रा स्कार्पिओ गाडीमध्ये डिझेल भरण्याकरीता फिर्यादी हे त्यांच्या मामाबरोबर वाकड येथील पेट्रोलपंपावर गेले होते. त्यावेळी डिझेल भरणाऱ्या आरोपी कामगाराला फिर्यादीने १५०० रुपयांचे डिझेल भरण्यास सांगीतले.
त्यावेळी आरोपीने डिझेल मीटरमध्ये ५७ रुपयांच्या पुढे डिझेल सुरु केले. त्याला तशी विचारणा केली असता त्याने दुसरा कामगार सहआरोपी यास बोलावुन घेतले. त्यावेळी तो सह आरोपी हा मुख्य आरोपी कामगाराला ‘भिका-यांना असेच जाऊ दे’, असे म्हणाला. त्यावरून त्यांचा वाद झाला. सह आरोपीने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या इतर चार कामगारांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.
हा प्रकार (दि. २) रोजी ४.०० वाजता बालवडकर पेट्रोलपंप, बैंगलोर-मुंबई हायवे रोड, वाकड येथे घडला. फिर्यादी संदिप कृष्णा खिलारे यांनी आरोपी योगेश बळी शिंदे, तुकाराम संजय सोमवंशी, इतर ४ लोकांविरुद्ध फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५२९/२०२३ भादंवि कलम ३२३, ५०४,१४३, १४७, १४९ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.












