- जूनच्या मध्यात पावसाने ओढ दिल्याने जलसंकट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा २०.४० टक्क्यांवर आला आहे. जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षी आजच्या तारखेला २२.०६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले.
शहरातील लोकसंख्येत ज्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता वाढत नाही. पाण्याची उपलब्धता वाढत नसल्याने एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे शहरातील सर्वच भागात समान पाणीपुरवठा झाला. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. महापालिका दिवसाला ५८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवठा करत आहे. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची उपलब्धता पाहता दिवसाआडच पाणीपुरवठा कायम ठेवला जाणार आहे, अशी माहिती श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी दिली.















