न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- शेळयांसाठी शेतातील हत्ती गवत कापत असताना फिर्यादीला शेताच्या बांधाच्या बाजूला दारूच्या बाटल्या तसेच काचा पडलेल्या दिसल्या. याबाबत त्यांनी आरोपीला माझ्या शेतामध्ये दारूच्या बाटल्या का टाकता? याबाबत विचारणा केली. त्यावर आरोपींनी आम्ही बाटल्या टाकत नाही, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीच्या अंगावर धावून गेले.
सह आरोपीने पडलेले लाकूड उचलले व तसेच इतर आरोपींनी पडलेले कौल उचलले फिर्यादीला मारण्यासाठी अंगावर धावून गेले. त्यावेळी मुख्य आरोपीने फिर्यादीला ढकलून दिले. ते जमिनीवर खाली पडले. आरोपीने फिर्यादीच्या हातातील कोयता हिसकावून त्यांच्या डोक्यात दोन वेळा मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास फिर्यादीच्या सांगुर्डीतील शेतात घडला. फिर्यादी चंद्रकांत मारूती भसे यांनी आरोपी चेतन सुनिल भसे, अनिल लक्ष्मण भसे, अजित हिरामण भसे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३३९ / २०२३ भा.द.वि.कलम ३२६,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.