न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- योग ही भारताच्या प्राचीन परंपरेतील एक अमूल्य देणगी आहे. हे व्यायामाचे एक असे प्रभावशाली स्वरूप आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शारीरिक अवयवच नव्हे तर मन, बुद्धी, आत्म्याच्या दरम्यान संतुलन निर्माण केले जाते. त्यामुळेच योगाद्वारे शारीरिक व्याधिंच्या व्यतिरिक्त मानसिक समस्यांचेही निराकरण केले जाऊ शकते. निरंतर योगाभ्यासाने तल्लख बुद्धी, स्वस्थ हृदय, सकारात्मक भावनांची जागृती आणि शांतीसुखाने युक्त अशी जीवनशैली शक्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करुन आपण केवळ तनावमुक्तच राहू शकतो असे नव्हे तर एक आनंदी व सहजसुंदर जीवन जगण्याची कलाही आपल्याला प्राप्त होते. सध्याच्या धावपळीच्या युगात योगाची नितांत आवश्यकता आहे. जगातील जवळपास सर्व देशांकडून या योग संस्कृतीचा सहजपणे अंगीकार केला जात आहे.
दरम्यान संत निरंकारी मिशनच्या वतीने उद्या (दि. २१) ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ मिशनच्या विविध शाखांमध्ये वसुधैव कुटुम्बकम चा सिद्धांत समोर ठेवत ‘वन वर्ल्ड, वन हेल्थ’ संकल्पनेवर स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या जागांमध्ये तसेच उद्यानांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे.
पुणे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या संत निरंकारी सत्संग भवन ,गंगाधाम सहित, संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह पुण्यामध्ये २९ ठिकाणी योग दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण भारतवर्षात ४०० ठिकाणी ‘योग दिवस’ कार्यक्रमाचे विशाल रूपात आणि मोठ्या उत्साहात आयोजन केले जाणार आहे.















