- पहिल्या टप्प्यात दहा हजार बचत गटांचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व महिला बचत गटांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करुन दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची (पीएमयू) निर्मिती केली आहे. टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट या खासगी संस्थेमार्फत तीन वर्षे चालविल्या जाणाऱ्या या कक्षासाठी सुमारे आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
शहरातील बचत गटांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी महापालिकेकडून अनुदान दिले जाते. शहरात महिला बचत गटांची संख्या अधिक आहे. दिव्यांग, तृतीयपंथीय तसेच, करोनामध्ये विधवा झालेल्या महिलांचेही कोविड योद्धा महिला बचत गट स्थापन केले आहेत.
बचत गटातील महिलांचीक्षमता विकसित करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, रोजगारांच्या संधी आणि बाजारपेठ यांची सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, संस्थात्मक बांधणी, आर्थिक साक्षरता या माध्यमातून बचत गटांचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी या कक्षाची स्थापना करणार आहे. या कक्षाचे कामकाज करण्यासाठी २४ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२२ या एका महिन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानंतर मध्यवर्ती भांडार विभागाकडून निविदा काढण्यात आली. त्यात टाटा कम्युनिटी इनिशिटिव्हज ट्रस्ट आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हमेंट या दोन खासगी संस्थांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त आणि अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण केले.
- पहिल्या टप्प्यात दहा हजार बचत गटांचे सक्षमीकरण…
समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बचत गटांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पालिकेने मिशन स्वावलंबन हा उपक्रम राबविला होता. यामध्ये दीड हजार बचत गटांचा समावेश केला होता. हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट या खासगी संस्था आणि समाज विकास विभाग एकत्र काम करणार असून पहिल्या टप्प्यात १० हजार, दुसऱ्या टप्प्यात ५ हजार, तिसऱ्या टप्प्यात उर्वरित गटांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बचत गटासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे शहरातील बचत गटांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेकडे तब्बल २० हजार बचत गट नोंदणीकृत आहेत. पालिकेच्या समाज विकास विभागामार्फत बचत गटांना अनुदान, त्यांच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पवना थडीजत्रा सारखे उपक्रम राबविले जात आहेत.
शहरातील सर्व बचत गटांचे सर्वेक्षण करुन संगणकीय डाटा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाद्वारे तयार करणार आहे. गटाच्या क्षमता वाढीसाठी मुलभूत प्रशिक्षण आणि अकाउंटविषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गटाच्या कुवतीनुसार व्यवसायाची निवड करुन देणे, गटांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावे, या उद्देशाने विविध उद्योगांची महिती देणे, उद्योग आणि व्यवसायासाठी प्रवृत्त करणे आदी कामे हा कक्ष करणार आहे.


















