न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- चालकाचा ताबा सुटल्याने भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅसवाहू टँकर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास निगडीतील कै मधुकरराव पवळे पुलाच्या अलीकडं अपघातग्रस्त होऊन पलटी झाल्याने गॅस गळती झाली.
टँकरमध्ये तब्बल १८ हजार किलो गॅसचा साठा असल्याने आणि भर वस्तीत ही दुर्घटना घडल्याने पुढील धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून घटनास्थळापासून ३०० मीटर पर्यंतचा परिसर पूर्णपणे बंद केला होता. सायंकाळी साडेपाच वाजता गॅस गळती पूर्णपणे थांबविण्यात यश आले. या अपघातात टँकर चालक राजेंद्र कुमार यादव हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅसवाहू टँकर मुंबईहून सोलापूरकडे जात होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती पुलाजवळ टँकर येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टँकर पलटी झाला.यावेळी झालेल्या प्रचंड मोठ्या आवाजाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची चार पथकं घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी गॅसची विभागणी करून टँकर बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.
घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, चिपाडे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल पोलीस उपायुक्त विवेक पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर ५० पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.












