न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- गेल्या काही दिवसांपासून विकासनगर परिसरात चोरींचे आणि व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, व्यापाऱ्यांनी मुकाई चौकापर्यंत मोर्चा काढला.
व्यापारी संघटना विकासनगर किवळे यांच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी व महापालिकेचे अधिकारी आर. एस. बटुले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विकासनगर, किवळे परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पोलिस चौकी सुरू करावी; तसेच पोलिसांची गस्त वाढवावी, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांची कायमस्वरुपी नेमणूक करावी, स्वच्छतागृहांची सोय करावी आणि व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोर्चात संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, कृष्णराज पुरोहित, संजय बसंल, मोतीलाल चौधरी, अविनाश गाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, उद्योजक शाम सिंधवाणी, सुधीर तरस, शिवसेनेचे निलेश तरस, संघटक राजेंद्र तरस, दिलीप दांगट, राष्ट्रवादीचे बापूसाहेब कातळे यांसह ३०० व्यापारी सहभागी झाले होते.












