न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीचे कोटा, तसेच कॅपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २७ ते २९ जून दरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरता येणार आहे. ३ जुलैला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशासाठी ३२४ महाविद्यालयांत ८८ हजार ६०४ कॅपच्या, तसेच २४ हजार ७८६ कोटा प्रवेशाच्या अशा एकूण १ लाख १३ हजार ३९० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत कोटा आणि कॅप मिळून २७ हजार २५३ जागांवर विद्याथ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, प्रवेशासाठी ८६ हजार १३७ जागा उपलब्ध आहेत.
प्रवेश जाहीर झालेल्या विद्याथ्यांपैकी केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले आहे. आता दुसऱ्या फेरीसाठी २७ ते २९ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येईल.
महत्त्वाच्या तारखा…
३० जून ते २ जुलै :- अर्जाच्या माहितीवर प्रक्रिया.
३ जुलै :- सकाळी १० वा. गुणवत्ता यादी जाहीर होणार.
३ ते ५ जुलै :- यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार.
२७ जून ते ५ जुलै :- कोटा प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया.












