पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचा पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- शहरातील दाव्यांची संख्या लक्षात घेता नेहरूनगर, पिंपरी येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा पुणे जिल्ह्याचे पालक न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.
पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांतर्फे अॅड. नितीन पवार, अॅड. मंगेश खराबे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर, पिंपरी -चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विलास कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, सदस्य अॅड. स्वप्नील वाळुंज, ॲड. सौरभ जगताप, अॅड. नितीन पवार, अॅड. मंगेश खराबे, अॅड. सत्यम निंबाळकर उपस्थित होते.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांची मुंबई उच्च न्यायालयात भेट घेतली. नेहरूनगर, पिंपरी न्यायालयात वरिष्ठ न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय स्थापन व्हावे याकरिता निवेदन देण्यात आले. पुढील महिन्यात वरिष्ठ न्यायालय स्थापन करून कामकाज सुरू करण्यासंदर्भात न्यायाधीशांनी आश्वस्त केले. मोशी येथील प्रस्तावित न्यायसंकुलाचे भूमिपूजन करण्यासंबंधी आढावा घेऊन भूमिपूजन व्हावे याकरिता सकारात्मक चर्चा करण्यात आली.












