न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल लागला असून, एकूण १९७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
महापालिकेच्या शाळेतील पाचवीचा निकाल ३१.२५ टक्के तर आठवीचा निकाल २९. ४ टक्के लागला आहे. यावेळी मनपा व खासगी शाळेतील पाचवीतील १०० विद्यार्थी तर आठवीतील ९७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यावर्षी महापालिका शाळेतील पाचवीचे ७२१३ पैकी ६८८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१५० विद्यार्थी पात्र ठरले. तसेच आठवीच्या ४७८५ पैकी ४६०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३३८ विद्यार्थी पात्र ठरले.
महापालिकेच्या वाकड शाळेतील तीन, मोशी मुले प्राथमिक शाळा, रावेत प्राथमिक शाळा, विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, पिंपरीगाव, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा, कुदळवाडी प्राथमिक शाळा, जाधववाडी मुले प्राथमिक शाळा, जाधववाडी कन्या शाळा प्रत्येकी एक विद्यार्थी, असे एकूण १० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
गुणवत्ता यादीतील पाचवीचे युवराज राठोड (८२ टक्के), वाजित शेख (८१.३३ टक्के), क्षितिज कामने (८०.६६ टक्के), शोएब शेख (७९.३३ टक्के), आराध्या चव्हाण (७४.६६ टक्के), त्रिशा शिरसाठ (७४ टक्के), परीक्षा ठाकूर (७२.६६ टक्के), दत्तप्रसाद वाळेकर (७२.६६ टक्के) आणि आठवीचे धीरेंद्रकुमार महातो (जाधववाडी मुले प्राथमिक शाळा, ६८ टक्के) प्रगती मथुरदास बडगे (जाधववाडी कन्या प्राथमिक शाळा, ६७.३३टक्के) या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.












