न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारांच्या कार्यालयात घुसून प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेत हातवारे करत बोलत धमकावल्याची घटना गुरुवारी (दि. २०) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. रितेश शरद काळोखे याने कार्यालयात घुसून हातवारे करीत मुख्याधिकारी निकम यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला.
यावेळी उपस्थित असणारे अधिकारी रामराव खरात, लेखपाल भांगे, अभियंता संघपाल गायकवाड, महेश वाळके यांना देखील धमकाविले. त्यामुळे पोलीस सुरक्षा व एक सुरक्षारक्षक देण्यात यावा. तरच मी या कार्यालयात काम करू शकतो. तसेच या व्यक्तीला नगरपंचायत आवारात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, अशा विनंतीचे निवेदन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. या घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवित एक दिवसीय सामूहिक रजेवर गेले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज ठप्प झाले होते















