न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल, डूडूळगाव येथे भारताचा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये साजरा झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हभप पंकज महाराज गावडे तसेच पुरुषोत्तम महाराज संस्थेचे अध्यक्ष भोसरी विधानसभेचे प्रथम आ. विलास लांडे, सचिव सुधीर मुंगसे, विक्रांत लांडे, रजिस्टर अश्विनी चव्हाण, मुंगसे, लांडे, माजी सैनिक तसेच पूर्ण कॅम्पसमधील सर्व प्रिन्सीपल, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.आकाश गावडे आणि कल्याणी केऱ्हाळकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कु.आरती मिठे हिने ईशस्तवन सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि राष्ट्रगीत गाण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी सर्व आसमंत दुमदुमला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनाचे भाषण इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका नीतू अरोरा यांनी केले तर प्रमुख अतिथी हभप पंकज महाराज गावडे यांनी आपल्या भाषणातून विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालने किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले. त्याचबरोबर लांडे यांनी शैक्षणिकदृष्ट्या कॅम्पसचे वातावरण किती पोषक आहे याबद्दल सर्वांना माहिती दिली.
स्वतंत्रता दिवसासाठी मुलांचे विशेष कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने परेड, देशभक्तीपर गीत, मल्लखांब देशभक्तीपर गीतावर नृत्याविष्कार, नाटक, बक्षीस समारंभ अशा विविध कार्यक्रमाने आजचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलच्या उपमुख्याध्यापिका उर्मिला जाधव यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमाने झाली.















