- व्यावसायिक इमारत उभारून एकाला दुकानाऐवजी भासवला फ्लॅट..
- डॉक्टरची फसवणूक; पिंपळे गुरवमधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- पिंपळे गुरव येथील स. नं. ७२ हिस्सा नं. १ ब / ४९ या मिळकतीवर कोणताही बांधकाम परवाना नसताना मौजे सांगवी स. नं. ७८ / १ क या जागेचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बनावट शिक्क्यांचा वापर करुन बांधकाम चालु करण्यासाठी बनावट दाखला तयार केला. तेथे व्यावसायिक इमारत बांधली. तसेच पहिल्या मजल्यावर दुकान क्र. ०१ ते ०३ (एकुण क्षेत्रफळ ६३८ चौ. फुट ) हे एकत्र करुन तो फ्लॅट क्र. ०१ असल्याचे व त्याचे एकुण क्षेत्रफळ ८५० चौ. फुट असे असल्याचे कागदोपत्री तयार करुन तो फ्लॅट सह आरोपीला सन २००५ मध्ये विकला.
मुख्य आरोपी व सह आरोपी यांचा व्यवहार पुर्ण झाला नसताना तसेच नमुद फ्लॅट हा फ्लॅट नसुन दुकान क्र. ०१ ते ०३ असे असल्याचे लक्षात आल्याने तिसऱ्या सह आरोपीने नमुद दुकान क्र. ०१ ते ०३ हे सन २०१६ मध्ये विकुन फिर्यादीकडुन २७,५०,००० रुपये टप्याटप्याने चेकद्वारे व आर. टि. जी. एस. द्वारे घेवुन फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते आज पावेतो मौजे पिंपळे गुरव येथील स. नं. ७२ हिस्सा नं. १ व ४९ या मिळकती वरील गोविंद मार्केटमध्ये घडला. फिर्यादी सुरेश डोंगरसिंग नाईक (वय ४३ वर्षे, धंदा डॉक्टर, रा. नवी सांगवी) यांनी आरोपी किरण शंकर गारवे, किशोर शंकर गारवे (दोघेही रा. पिंपळे गुरव), यशवंत माधवराव बारहाते (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ४२८ / २०२३भा. दं.वि कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, १२० (ब), ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गवारी पुढील तपास करीत आहेत.


















