- पहिल्या टप्यात आठ ठिकाणी केंद्रांची उभारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- शहरामध्ये रोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सोळा ठिकाणी स्थानांतरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्यात आठ ठिकाणी केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन केंद्रांचे काम पूर्ण झाले असून, त्याठिकाणी कचरा स्थानांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.
शहरात रोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्यरीतीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे ८० एकर जागा राखीव आहे. येथे शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. महापालिका हद्दीत सध्या प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. संपूर्ण शहरातून वाहनांद्वारे घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. त्यासाठी शहरात ३० ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. मात्र, ते शास्त्रीय पद्धतीने नसल्याने तिथून कचरा उचलण्यास अडचण होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बो-हाडेवाडी, कासारवाडी, गवळी माथा, काळेवाडी, सांगवी, खंडोबा माळ, चोविसावाडी, किवळे येथे घनकचरा स्थानांतरण केंद्रे आहेत. कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील कचरा संकलित करताना वाहनांसाठी इंधनाचा वापर होतो. यातून हवेचे प्रदूषण होते. कित्येकदा द्रवरूपी कचऱ्याची गळती रस्त्यावर होते. दुर्गंधीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. हे प्रकार टाळण्यासाठी परिसरातील कचरा गोळा करून गाड्या कचरा स्थानांतरण केंद्रात आणतील. तिथून २० टन एकाचवेळी कचरा उचलून मोशी येथील कचरा डेपोत नेला जाईल.
शहरात रोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्यरीतीने व्यवस्थापन होण्यासाठी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शाश्वत विकासासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. त्यातीलच हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. भविष्यात प्रत्येक प्रभागात दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका…

















