- गावात उपस्थितीबाबतचे वेळापत्रक अनं नियोजित दौऱ्याची माहिती देणे बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठका आदींची माहिती तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावाव्यात. तसेच सजा कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थितीबाबतचे वेळापत्रक निश्चित करून त्यांची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
एकापेक्षा जास्त गावाकरीता एकच तलाठी असल्याने तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सजाच्या ठिकाणी अथवा गावांच्या ठिकाणी ठराविक वेळेत तलाठ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु, तलाठी सजाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासनास निवेदने येत आहेत. यामुळे जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरीता सर्व तलाठ्यांनी सजांच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक लावण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत.
तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तलाठी यांच्याकडे महसूल विभागाकडील कामे असतात. यामध्ये प्रामुख्याने सात-बारा उताऱ्यावर खरेदी विक्री नोंदी घेणे, वारसनोंद आदी कामे असतात. तसेच शेतकऱ्यांशी निगडित पीक पाहणीची ई-पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्त्वाचा दुवा आहेत.