- अद्यापही वीस हजारांच्या जवळपास जागा रिक्त; उद्या अखेरचा दिवस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सध्या प्रतीक्षा यादीतील चौथ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी सोमवारी (दि. २१) शेवटचा दिवस आहे. प्रवेशासाठी अद्यापही १८ हजार ९६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्याथी आणि प्रतीक्षा यादीतील विद्याथी अशा एकूण ८२ हजार ८७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश जाहीर करण्यात आले. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी चार फेल्या राबवण्यात आल्या. त्यात पहिल्या फेरीत १३ हजार ६५५, दुसऱ्या फेरीत ३ हजार ५७९, तिसऱ्या फेरीत १ हजार २५९ आणि चौथ्या फेरीत ४७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
प्रवेशासाठी सोमवारी शेवटचा दिवस आहे. परंतु सध्या उपलब्ध जागांपैकी ८२ हजार ८७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर प्रवेशासाठी अद्यापही १८ हजार ९६८ जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.















