न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- विनाहेल्मेट वाहन चालवत असाल तर सावधान, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १९४ ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे.
पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’कडून विविध खासगी कार्यालये, शाळा, कॉलेज तसेच विविध शासकीय आस्थापनांमध्ये हेल्मेट वापराविषयी प्रबोधनात्मक नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी याविषयी प्रबोधनात्मक सत्र घेण्यात आली.
या माध्यमातून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे का गरजेचे आहे. हे विविध उदाहरणे तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून देण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करताना आजवर ४ हजारांहून अधिक विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. केवळ जुलैत १४८६ विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केलेली आहे.
‘‘आपल्या जिल्ह्यात प्राणांतिक अपघातामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत अधिक आहे. ते कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली आहे. तसेच दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा, यासाठी लोकांना विविध माध्यमातून विनंती केली जात आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड…















