- चुकीने दुबार बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून बक्षिसाची रक्कम परत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- पिंपरी महापालिकेच्या समाज विकास विभागाने दहावी व बारावीतील २५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर चुकून दोनवेळा बक्षिसाची रक्कम जमा केली. त्यापैकी २४६ विद्याथ्यानी ही रक्कम महापालिकेला परत केली असून ४ विद्यार्थ्याचे पैसे येण्याचे बाकी आहेत.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविली जाते. दहावी व बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ हजार, तर ८० ते ९० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. यासाठी या विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्याकडून गुणपत्रिका, आधारकार्ड, शहरात वास्तव्यास असल्याचा पुरावा, बँक खात्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी बँकेकडे दिली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात बक्षिसाची रक्कम जमा करण्यात आली होती. एकूण २५० विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये दोनदा पाठविण्यात आले. दोनदा पैसे गेल्यानंतर ही रक्कम परत मिळविण्यासाठी लिपिक व कर्मचाऱ्यांनी फोन करत रक्कम परत पाठविण्याची विनंती केली.
दोनवेळा बक्षीस मिळालेल्या २४६ विद्यार्थ्यांकडून पैसे परत आले आहेत. फक्त चार विद्यार्थ्यांनी पैसे परत केले नाहीत. मागील शैक्षणिक वर्षातील दहावी, बारावीच्या ४ हजार ५९३ गुणवंत विद्यार्थ्यांना १० कोटी पाठविण्यात आले. १४ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या शैक्षणिक वर्षातील एकही विद्यार्थी बक्षिसापासून वंचित राहिलेला नाही.
– अजय चारठाणकर, उपायुक्त, महापालिका..















