- महिलांनी नोंदविला मोठा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- विमाननगर, लोहगाव परिसरात लोकसंख्येचा वाढता आलेख पाहता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही आ वासून उभा राहिलेला आहे. कलवड या उपनगरात दाट लोकवस्ती आहे. तसेच महिलेंचा सुरक्षेचा प्रश्नही सध्या भेडसावत आहे. त्यामळे मोठ्या प्रमाणात परिसरातील महिला भगिनी या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या राज्यभर व्यापलेल्या संस्थेच्या पोलीस मित्र म्हणून सहभागी होऊन कलवड परिसरात शाखा उघडण्याकरिता इच्छुक होत्या.
त्यानुसार या परिसरात महिलांच्या मोठ्या सहभागाने नुकतीच ‘पोलीस मित्र समितीची’ स्थापना करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, पुणे शहर वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता भीमराव चव्हाण, पुणे शहर सुरक्षा समिती प्रमुख संदीप कुंबरे, कलाप्पा डोंगरे, माने गुरुजी, श्रीनिवास हजारे, विभाग अध्यक्ष संतोष चव्हाण, अमोल कानू शहर महासचिव सारिका फडतरे, उद्धवर जाधव, सोपान महाजन, श्रीमंत गायकवाड, रामदास कांबळे सचिन माने उपस्थित होते.
या प्रसंगी अनिता चव्हाण म्हणाल्या,” लोहगाव परिसरात शालेय विद्यार्थीनी तसेच महाविद्यालय तरुणी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे चाकरमानी महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे. अश्यामुळे परिसरात अप्रिय घटना टाळण्यासाठी महिलांनी संघटित होंवून सुरक्षा समिती प्रतिनिधी ,सदस्य होणे आवश्यक होते. याकरिता परिसरात पोलीस मित्रांची समिती स्थापन होणे आवश्यक होती. विशेषतः महिलांची पोलीस मित्र समिती स्थापन होणे आवश्यक होती. त्याची सुरुवात कलवड लोहगाव येथे होत असल्याने मला आनंद वाटत आहे.”
लोहगाव विमाननगर शाखा प्रमुख प्रतिभा संदीप कांबळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात सामाजिक कार्य करीत असताना महिलांना अनेक सुरक्षा संबंधित अडचणी भेडसावत असल्याचे दिसून आले.त्याकरिता परिसरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची पोलीस मित्र शाखा स्थापन करण्याचा हेतू समोर आला.त्यानुसार आज रोजी कलवड येथे महिलांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत शाखा स्थापन करण्यात आली.
समिती राज्य अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” या परिसरातील महिलांची संख्या पाहता सुरक्षा कृती समितिची स्थापना होणे आवश्यक वाटले. त्यानुसार आज या ठिकाणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची स्थापना करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील मोठा अनुभव असणाऱ्या महिला भगिनींना समितीच्या वतीने ओळ्खपत्रही देण्यात आले. ह्यामुळे विमाननगर पोलीस ठाण्याअंतर्गत महिला भगिनींना पोलीस विभागास सहकार्य करता येईल. तसेच परिसरातील महिलांना तातडीने मदत उपलब्ध होईल.याकरिता समितीच्या वतीने महिला प्रमुख अर्चना घाळी, गौरी सरोदे ,अँड विद्या शिंदे यांचे विशेष मार्गदशन मिळेल.”
कार्यक्रमाचे संयोजन प्रतिभाताई कांबळे, सपना कानू, अमित डांगे,राकेश गायमुक्ते,रामदास कांबळे, संदीप कांबळे यांनी केले.















