- शहरातील २ लाखांपेक्षा अधिक घरांची तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- डेंग्यू आजाराला आळा बसावा यासाठी शहरातील डासांची उत्पत्ती स्थानके शोधण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. यासाठी १ जून कालावधीत आरोग्य विभागाने शहरातील २ लाख ६९ हजार ७५४ घरांची तपासणी करून १३ लाख २९ हजार २०३ कंटेनरची तपासणी केली. यामध्ये ५ हजार ४५९ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रीजच्या मागील ट्रे, कुंड्या तसेच रुग्णालये, काम सुरू असलेली बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत आहे.
आतापर्यंत ९९२ टायर आणि भंगार दुकाने, ११५४ बांधकामांची तपासणी करून ३ हजार ५३० कंटेनर रिकामे केले. यामधील १ हजार २११ जणांना नोटीस दिल्या. डास आढळलेल्या मालमत्तांकडून ८ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. घरगुती आस्थापनांना १ हजार, व्यावसायिक आस्थापनांना २ हजार तर मॉल, हॉस्पिटल, बांधकाम सुरू असलेल्या इमारत यांना १० हजारांचा दंड आकारण्यात येतो, अशी माहिती आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.















