- जंतूनाशक आणि दुर्गंधीनाशकाच्या पुरवठ्यात गोलमाल?..
- शहर मनसेच्या रुपेश पटेकरांचा आयुक्तांना सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- सलग पाच वर्ष गरज नसताना सुरहिद केमिकल्स आणि पुनि लॅब या एकाच ठेकेदाराला काम देण्याचा महापालिका अट्टाहास का करीत आहे?. त्यामुळे पालिकेचा आरोग्य आणि मध्यवर्ती भांडार विभाग यांच्या कामकाजासंदर्भात शंका निर्माण होत आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करवाई, अशी मागणी शहर मनसे सचिव तथा महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रुपेश पटेकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सुरहिद केमिकल्स मुंबई आणि युनि लॅब मुंबई यांच्यामार्फत जंतूनाशक आणि दुर्गंधीनाशकाचा पुरवठा अनुक्रमे स्टेरी ए एफ एम आणि बँक्तोडेक्स या दोन्ही मालासाठी प्रस्तावित निविदा, पुरवठा आदेश अथवा थेट खरेदी पद्धतीने देण्यात आलेल्या पुरवठा आदेशाबाबत मागिल पाच वर्ष कालावधीमधील संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी. तसेच महागडे प्रोडक्ट खरेदी करताना बाजारात स्वस्त प्रोडक्ट उपलब्ध आहेत का? याबाबत महानगरपालिकेने काही ठोस पावले उचलली का? तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेला या दोघांच्या व्यतिरिक्त इतर ऑप्शन्स का प्राप्त होऊ शकले नाही? दोन्ही संस्थांची सूत्र हलवणारा आणि महानगरपालिकेमध्ये येऊन वाटाघाटी करणारा सुरहिद केमिकल्सचा एकच माणूस महानगरपालिकेमध्ये आढळतो, असेही म्हटले आहे.
आतापर्यंत केलेल्या निविदांमध्ये नेहमी त्याच त्या कंपन्या भाग घेतात. लघुत्तम दर फक्त वरील संस्थेचेच येतात. तसं पाहिलं तर ही जादू कशी केली जाते याचा नक्की विचार करावा? गरज नसताना सुद्धा या प्रोडक्टचा दरवर्षी खप केला जातो आणि नवीन खरेदीचा घाट घालण्यात येतो. त्यामुळे आरोग्य विभाग तसेच मध्यवर्ती भांडार विभाग यांच्या कामकाजासंदर्भात शंका निर्माण होते. याबाबत आपण मागील पाच वर्षांची माहिती घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी. दोन्ही संस्थांची चालू निविदा किंवा त्यांचे बाकी देयक संपूर्ण चौकशी होईपर्यंत थांबवावे, असे या निवेदनात पटेकर यांनी म्हटले आहे.















