न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून १५ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लिग २.० व सफाईमित्र यांच्याकरिता सेवा व सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता निगडी भक्ती शक्ती चौक येथे इंडियन स्वच्छता लिग २.० मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या मोहिमेद्वारे शहरात “कचरा मुक्त शहर” (जी एफ सी ) प्रमाणीकरण तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी ही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.















