न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२३) :- महापालिका स्तरावर शहर खड्डेमुक्त ठेवणे व रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करणे, रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात अचूक व नियमितपणे त्रैमासिक अहवाल शासनास पाठविणे, हे काम या समितीला करावे लागेल.
याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे. रस्त्यांच्या निकृष्ठतेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सर्व पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डयांची दुरुस्ती करण्याचा आदेश दिला होता, तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत व नादुरुस्तीबाबत नगरविकास विभागाला तीन महिन्यांनी अहवाल सादर करण्याचा आदेशही दिला होता. मात्र, अनेक महापालिकांचे त्रैमासिक अहवाल नियमितपणे न्यायालयास प्राप्त होत नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर अभियंत्यांची समिती गठित केली.
समितीच्या अध्यक्षपदी शहर अभियंता मकरंद निकम, सचिव म्हणून सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे असतील. यासह सहशहर अभियंता प्रमोद ओभासे, संजय कुलकर्णी, बापू गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभागाचे अधिकारी समितीचे सदस्य असणार आहेत.


















