- तळेगाव दाभाडेत सातव्या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाला ग्रीन सिग्नल..
- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २१ सप्टेंबर २०२३) :- तळेगाव दाभाडे येथील गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होत असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यावर सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषणसंबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवा दरम्यान ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांच्या मागणीस यश आले आहे.
तळेगाव दाभाडेतील गणेश विसर्जनासाठी २५ सप्टेंबरला ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, असे मागणी करणारे पत्र आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तळेगावातील गणेशोत्सव सात दिवसांचा असून सोमवारी गणेश विसर्जनाचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्वच गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असल्याने मध्यरात्रीपर्यंत वेळ वाढविण्याची मागणी त्यांनी केली होती.
सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने सदर दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी विनंती केली होती. त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव २ दिवसांपैकी १ दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जारी केले आहेत.
गणेशोत्सव काळात पाचव्या,सहाव्या आठव्या आणि नवव्या दिवशी रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठीची मर्यादा शिथिल केली आहे. परंतु तळेगाव दाभाडेतील गणेश विसर्जन सातव्या दिवशी म्हणजे २५ सप्टेंबरला होत आहे. त्यामुळे तळेगावातील विसर्जनासाठी नियम शिथिल करावेत, अशी मागणी सुनील शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यास यश आले आहे.
गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार २३ सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार २४ सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार २६ सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार २७ सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार २८ सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.