न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त नुकतेच छायाचित्रकार राजेश एम पवार यांचे कलात्मक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात ग्रामीण जीवन, शहरातील लोकजीवन, वन्यजीव, पक्षी, बौद्ध लेणी अशा अनेक विषयांच्या छायाचित्रांचा समावेश होता. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा या छायाचित्र प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला.
दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले होते. उन्नती फाउंडेशनचे सर्वेसर्वा संजय भिसे व डॉ. कुंदाताई संजय भिसे यांचे मोलाचे सहकार्य या छायाचित्र प्रदर्शनास लाभले. अशा प्रोत्साहनामुळेच कला जिवंत राहते व वृद्धिंगत होते, असे मत राजेश एम पवार यांनी व्यक्त केले.
या छायाचित्र प्रदर्शनाच्या यशात भाऊसाहेब गरजे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कलात्मक फोटोग्राफी विषयी लोकांमध्ये माहिती व्हावी व आपला पुणे व पिंपरी चिंचवड परिसर एका वेगळ्या अँगलने कसा सुंदर दिसू शकतो? या उद्देशाने हे फोटोग्राफी प्रदर्शन केल्याचे पवार यांनी सांगितले.
या प्रदर्शनास पद्मश्री गिरीश प्रभुणे, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप, उन्नती सोशल फाउंडेशनचे संजय भिसे व डॉ. कुंदाताई संजय भिसे, पी के स्कूल चे आप्पासाहेब काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.












