- तळवडेसह आयटी पार्कची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर व एमआयडीसी चाकण या भागास जोडणारा तळवडे – निगडी हा एकमेव रस्ता आहे. औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी कोंडीत २ ते ३ तास लागतात. ही कोंडी सोडविण्यासाठी तळवडे आयटी पार्क ते निगडी भक्ती- शक्ती समूह शिल्प चौक असा पर्यायी रस्ता विकसित करण्याची गरज आहे.
केवळ रस्ता विकसित करण्यासाठी देहू ॲम्युनेशन डेपोची म्हणजे संरक्षण विभागाची जागा घ्यावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तळवडेच्या रहिवाशांनी घातले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे रहिवाशांचे मत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
चाकण, म्हाळुंगे- एमआयडीसी, तळवडे आयटी पार्क तसेच, देहू, निघोजे या परिसरातून पिंपरी-चिंचवड शहरात याच रस्त्याने अजवड वाहतूक होते. या रस्त्यावर कंटेनर व अजवड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने वारंवार अपघात होतात. तळवडे, रूपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे ते निगडी हा एकमेव रस्ता असल्याने दिवसा वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या रस्त्याला समांतर तळवडे आयटी पार्क चौक ते भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असा पर्यायी रस्ता विकसित करणे शक्य आहे. संपूर्ण रस्ता विकसित करण्यासाठी देहू अॅम्युनिशन डेपोच्या सीमेवरील काही जागा आवश्यक आहे. त्या ठिकाणी कोणतेही विकास काम होणार नसून, केवळ पर्यायी वाहतुकीसाठी रस्त्याचे काम होणार आहे. देहू अॅम्युनिशन डेपोशी संपर्क साधल्यास पर्यायी रस्ता करणे शक्य आहे.
जोतीबानगर, गणेशनगर येथील रहिवाशांना वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो. शहरातील नागरिक, तळवडे येथील रहिवाशी, औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध होण्यासाठी मागणी करीत आहेत. हा पर्यायी रस्ता झाल्यास वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होऊन इंधन व वेळेची बचत होणार आहे. शहरातील औद्योगिकीकरणास यामुळे चालना मिळणार आहे. अजवड वाहतुक सुरळीत झाल्यास संपूर्ण शहराला त्याचा फायदा होऊन वायू व ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तळवडे आयटी पार्क चौक ते निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असा डीपी रस्ता तयार करण्यास पिपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना आदेश द्यावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना करण्यात आली आहे.













