न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये कित्येक मुले शाळाबाह्य आहेत. हाताला काम मिळावे यासाठी आर्थिक परिस्थिती बिकट असलेले लोक भाकरीचा चंद्र शोधत उद्योगनगरीच्या दिशेने येतात. मात्र, महापालिकेच्या अहवालातून अवघी २१९ मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले आहे. परंतु, हजारो मुले आजही शाळाबाह्य आहेत, असे सामाजिक संस्था सांगतात.
शहरातील झोपडपट्टी, बांधकामाची ठिकाणे, वीटभट्ट्या, दगडखाणी या ठिकाणी आजही अनेक मुले ज्ञानगंगेपासून वंचित आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. बेघर बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. महापालिकेने २०२१ आणि २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ६२० मुले शाळाबाहा मिळाली होती. यावर्षी मात्र ३४४ मुले शाळाबाहा मिळाली. त्यातून १२५ मुलांना वयानुरूप शाळेत दाखल केले, असा दावा शिक्षण विभाग करत आहे. त्यांना शाळानुरूप दाखल केले गेले आहे. त्यांच्या आई-वडिलांचे लेखी संमतिपत्र घेऊन त्यांना घेतले आहे. त्या मुलांचे अभ्यासाचे स्वरूप वेगळे असणार आहे. त्यांना त्यांच्या वयोगटानुसार त्या-त्या वयोगटातील वर्गात बसवले जाते.
शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणणे आमचे काम आहे. त्याच्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येते. त्यांचे जादा काळ वास्तव्य एका ठिकाणी नसते, तरीही त्यांना प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करत आहोत.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग…शहराचा वाढता विकास पाहता बांधकाम मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजही अनेक कामगारांची मुले शाळाबाहा आहेत. शाळाबाहा मुलांची संख्या शोधणे शक्य नाही.
– प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष, सहगामी फाउंडेशन…