न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 12 ऑक्टोबर 2023) :- पिंपळे सौदागर येथील जेष्ठ नागरिक संघाचा चौदावा वर्धापन दिन बुधवारी बासुरी बँक्वेट हॉल , हॉटेल गोविंद गार्डन पिंपळे सौदागर याठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते. या वर्धापन सोहळ्याप्रसंगी जेष्ठ महिला व नागरिकांसाठी हिंदी, मराठी सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला लाजवेल अशी उर्जा आणि उत्साह ज्येष्ठांनी दाखवून दिली आहे. वय हा फक्त एक आकडा असतो, त्याचा आपला उत्साह, आत्मविश्वास यावर कुठलाही प्रभाव पडत नसतो. उभ्या संपूर्ण आयुष्यात सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडून जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा बहुसंख्य नागरिक एकाकी जीवन जगत असतात. सहकारी दूर झालेले असतात. अश्या वेळी नवे सहकारी मिळावेत, सवंगडी मिळावेत व आयुष्याच्या या टप्प्यात आपला उर्वरित वेळ समाधानी व आनंदी जावा. त्यामुळेच एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी अश्या जेष्ठ नागरिक संघाचे योगदान मोलाचे ठरते.
यावेळी पिंपरी-चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या शहराध्यक्षा श्रीमती वृषाल मरळ, पिंपळे सौदागर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागवत झोपे, उपाध्यक्ष शोभा काळे, सचिव दिपक मारावर, कार्याध्यक्ष विलास नगरकर, कोषाध्यक्ष प्रकाश काळे, विलास जोशी व जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.