- राज्य शासनाच्या निर्णयाचा करणार निषेध..
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला जागा देण्यास नकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील गायरानाची जागा त्यासाठी योग्य असल्याचे पोलीस अधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यासाठी शासनाकडून देखील पाठपुरावा सुरु आहे. मात्र, जागा देण्यास देहू नगरपंचायतीने सपशेल नकार दिला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याच कारणासाठी उद्या शुक्रवारी (दि. १२) रोजी देहूगाव बंदची हाक देण्यात आली आहे. देहूतील चौका-चौकात देहुगाव बंदचे फलक लावण्यात आले आहे.
त्यावरील मजकूर असा, श्रीक्षेत्र देहूतील गट नं. ९७ या गावरान क्षेत्रातील जमीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी शासनाकडुन मागणी होत आहे. श्रीक्षेत्र देहू ग्रामस्त बंधु-भगिनींनी गावाची ही गायरान जागा गावाच्याच विकासासाठी उपयोगाला आणावी यासाठी ही जागा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास देण्यास यापूर्वीही विरोध केला आहे. तरी देखिल ही जागा घेण्यासाठी सद्यस्थितीत शासनाकडुन कार्यवाही होत आहे. ही जागा जर आयुक्तालयास गेली तर देहूसाठी क्रिडांगण, हॉस्पिटल, उद्यान, गावातील सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रमासाठी, आषाढी वारी पालखी सोहळा, कार्तिकी यात्रा, संत तुकाराम महाराज जन्मोत्सोव सोहळा व बीज सोहळा यासाठी येणाऱ्या लाखो भाविक भक्तांची राहण्याची, थांबण्याची सुव्यवस्था करणे अवघड होणार आहे. सर्व गावासाठी व लाखो भाविक भक्तांसाठी भविष्यात ही एक मोठी समस्या ठरणार आहे.
तेव्हा सर्व ग्रामस्थ बंधु-भगिनींनी एकमुखाने पोलीस आयुक्तालयास गावाची गावरान जागा देण्यासाठी जाहिर विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी (दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बंद ठेवणार आहोत. श्री क्षेत्र देह नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू (अध्यक्ष व विश्वस्त) सर्व ग्रामस्थ बंधु-भगिनी श्रीक्षेत्र देहू.