दिघी, भोसरी, मोशी, वडमुखवाडी, तळवडे, चिखली, निगडी, यमुनानगर, रुपीनगरमधील नागरिकांना धास्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२३) :- शहरातील रेड झोनमध्ये अनधिकृतरीत्या बांधकामे करून त्यांची विक्री सुरू आहे. कारवाई होणार नाही, या अपेक्षेने नागरिक गुंठेवारीत जागा खरेदी करत आहेत. सर्व्हे क्रमांक व प्लॉट क्रमांकानुसार नकाशे आणि रेड झोनची हद्द नव्याने जाहीर करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. मात्र, प्रशासनाने त्यांच्या आदेशालाही कात्रजचा घाट दाखवला आहे.
शहरातील दिघी मॅगझिन आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीमुळे दिघी, भोसरी, मोशी, वडमुखवाडी, तळवडे, चिखली, निगडी, यमुनानगर, रुपीनगर या भागात शासनाने भूसंपादन केलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे रेड झोनबाहेर असल्याचे सांगत घरांची विक्री सुरू आहे. रेड झोनची हद्द नेमकी कोठपर्यंत आहे याबाबत काहीच स्पष्टता नाही. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात रेड झोन नेमका कुठून सुरू होतो, त्याच्या सीमा कोणत्या, रेडझोनबाधित क्षेत्र नेमके कोठे व कोणते, याबाबत कोणतेही रेखांकन केलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्याचाच फायदा घेत अनेक जण रेड झोनमध्ये प्लॉटिंग करून गुंठेवारीने विकत आहेत. काहींनी गृहप्रकल्प उभारून सदनिका विक्रीचा धंदा सुरु केला आहे. त्यामुळे रेड झोनबाबत सर्व्हे क्रमांक आणि प्लॉट क्रमांकानुसार नकाशे हद्द नव्याने जाहीर करण्याची मागणी केली होती.
महापालिका क्षेत्रातील रेड झोनबाबत कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना त्यांच्या घरावर कर्ज मिळत नाही. जमीनदेखील विकसित करता येत नाही. मात्र, काही बड्या लोकांनी बिनदिक्कतपणे इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनीही पिंपरी-चिंचवड हद्दीतील रेड झोनचे नकाशे व सर्व्हेची माहिती तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरव राव यांना दिले होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराड यांनी महापालिका आयुक्तांना नव्याने नकाशे जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याने रेड झोनबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.















