- मतदानाच्या टक्केवारीवर हमखास परिणाम; इच्छुकांचा डोक्याला हात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :- शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने गावाकडे जाण्यासाठी एसटी स्थानक, खासगी बस अड्ड्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. शहरात वास्तव्यास असलेले बहुतांश नागरिक हे नोकरी-व्यवसायासाठी राज्याच्या काना-कोपऱ्यातून तसेच परराज्यातून आले आहेत. आता नागरिकांची गावाकडे जाण्याची लगबग पाहता याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दशकांमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक या शहरात नोकरी-व्यवसायाच्या निमिताने येऊन स्थायिक झाले आहेत. यापैकी बहुतेक नागरिक हे या शहरातील मतदार आहेत. शहरात तीन विधानसभा मतदारसंघ चिंचवड आणि पिंपरी हे दोन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात तर भोसरी विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात येतो. चिंचवड आणि पिंपरी या दोन मतदारसंघात मावळ लोकसभा मतदारसंघातील दहा लाखांहून अधिक मतदार आहेत.
शहरातील मतदारांची संख्या पाहता मतदानाचा टक्का वाढविण्यात किंवा कमी करण्यात पिंपरी-चिंचवडकरांचे मोठे योगदान असते. त्यातच एसटी स्थानकावरील आणि खासगी लांब पल्ल्याच्या बसला होत असलेली गदीं पाहून राजकीय पक्षांचे मात्र टेन्शन वाढत आहे.
निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असल्याने एवढ्या लवकर गावी गेलेले नागरिक मतदानासाठी परततील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे प्रशासनासाठी देखील ही बाब चिंताजनक आहे. एकीकडे जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून जनजागृती केली जात आहे आणि दुसरीकडे नागरिकांमध्ये गावाकड़े जाण्याची लगबग सुरू आहे.