न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- शहरात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट सुरू केले आहेत. मागील महिन्यात पुनावळे, चिखली येथील प्लांट महापालिकेने बंद केले आहेत. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केवळ ४० आरएमसी प्लांटला ‘ना हरकत’ दाखला दिलेला आहे. यापुढे पर्यावरण विभागाकडून लवकरच शहरातील आरएमसी प्लांटचे सर्वेक्षण हाती घेणार असून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती होत आहे. त्यासाठी आरएमसी प्लांट कार्यरत आहेत. त्यामुळे होणाऱ्या ध्वनी व वायु प्रदूषणामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत हे प्लांट विनापरवाना सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
रावेत, वाकड, चिखली, पुनावळे, मोशी आदी परिसरात हे प्लांट दिवसाढवळ्या सुरू आहेत. त्याने वायू आणि ध्वनीप्रदूषणात भर पडत आहे. आधीच शहराच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झालेली असताना या प्लांटमुळे प्रदूषणाच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पर्यावरण विभागाकडून लवकरच आरएमसी प्लांटचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांनी महापालिका पर्यावरण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून ‘ना हरकत’ दाखला घेतला का, तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनदेखील अनुषंगिक परवानगी घेण्यात आलेल्या आहेत का, याविषयी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एनओसी बंधनकारक..
महापालिका हद्दीत आरएमसी प्लांट सुरू करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे अर्ज दाखल करून ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक आहे. पर्यावरण कर्मचाऱ्यांकडून स्थळ पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्लँटला परवानगी आवश्यक आहे.