न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जुन्नर (दि. ११ मे २०२४) :- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे बाजरी पिकाचे राखण करताना बिबट्याने ज्या ठिकाणी नानुबाई कडाळे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले, त्याच बाजूला वन खात्याने बिबट्याला लावलेल्या पकडण्यासाठी पिंजऱ्यात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला असून, बहुधा कडाळे यांच्यावर हल्ला करणारा तो नरभक्षक बिबट्या असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पकडलेल्या बिबट्यावर येथेच गोळ्या घाला. आम्ही येथून बिबट्याचा पिंजरा हलवून देणार नाही, अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली. संबंधित महिलेवर हल्ला करणारा हाच तो बिबट्या आहे? याची खातरजमा करावी लागेल आणि तो नरभक्षक असेल, तर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, पिंपरी पेंढार येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये दुसरा एक बिबट्या शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जेरबंद झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. वन विभागाने या परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. ज्या ठिकाणी महिलेला बिबट्याने ठार केले त्यापासून एक किलोमीटर अंतरावर पिंजऱ्यात रात्री दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.












