- रेड झोन हद्दीतील ५८ एकर गायरान जागेत साकारतेय जैवविविधता उद्यान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तळवडे येथील रेड झोन हद्दीतील ५८ एकर गायरान जागेत जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) विकसित करण्यात येणार आहे. शहरातील खासगी कंपन्यांकडील सीएसआर निधीतून हे पार्क उभारले जाणार आहे. हे पार्क देशातील आगळेवेगळे उद्यान ठरणार असल्याचा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या काळात ही गायरान जागा राज्य शासनाकडून महापालिकेस विनामूल्य देण्यात आली, तेथे हरीण (डीआर) पार्क उभारण्यात येणार होते. मात्र, आता जैवविविधता उद्यान तयार केले जाणार आहे. त्यात वेगवेगळ्या वनस्पती, दुर्मीळ औषधी झाडे व वेली, देशी जातीची झाडे, फळ व फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. देशातील हे सर्वांत मोठे जैवविविधता उद्यान ठरणार असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
या ५८ एकरपैकी चार-चार एकरांतील दोन प्रकल्पांसाठी कासारवाडीतील दोन कंपन्यांनी ‘सीएसआर अंतर्गत निधी दिला आहे. खासगी एजन्सी नेमून तो प्रकल्प उभाण्याचा आराखडा तयार झाला आहे. उर्वरित ५० एकर जागेतही खासगी कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन प्रकल्प उभारले जाणार आहेत.
लोकवस्ती वाढल्याने डीअर पार्कला फुली..
नियोजित हरीण (डीअर) पार्कसंदर्भात महापालिकेने वनविभागाकडून अभिप्राय घेतला होता, या जागेशेजारी औद्योगिक परिसर असल्याने शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे भविष्यात मानवी हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. हरणांसाठी मोकळ्या गवताळ प्रदेशाची आवश्यकता असते. येथे हरणांचा कृत्रिम अधिवास तयार करणे उचित होणार नाही, असा अभिप्राय पुण्यातील भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पालिकेस दिला. त्यामुळे ते नियोजन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक चार एकरात एंका थीमवर झाडांची लागवड करून संवर्धन केले जाणार आहे. वेगवेगळ्या वनस्पती, दुर्मीळ औषधी व वेली, देशी जातीची झाडे लावण्यात येतील. त्या-त्या जागेवर पूर्ण प्रकल्पांची माहिती दर्शविणारे फलक असणार आहेत, पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रैक असणार असून, खाद्यपदार्थाचे स्टॉलही असणार आहेत.
तळवडेतील बायोडायव्हर्सिटी पार्क अनोखे असेल. महापालिकेची एकूण १९४ सार्वजनिक उद्याने आहेत, ती ४७४ एकर क्षेत्रात विकसित केली गेली आहेत, त्यातील काही निवडक उद्यानांत विविध धीमच्या आधारे सुशोभीकरण केले जाणार आहे. दुबईतील प्रसिद्ध कारंजे, मुंबईतील मायानगरी, जगातील सात आश्चर्ये या संकल्पनेवर उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.











