- कामगार उपायुक्तांचा उद्योगांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या १३ मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश पुणे विभागाचे कामगार उपायुक्त अभय गीते यांनी दिले आहेत. तर अशी सुट्टी देऊन त्या बदल्यात सुट्टीच्या दिवशी कामावर येण्यास सांगणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली जाणार आहे.
अपवादात्मक परिस्थितीत त्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्याठिकाणी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. सवलत देण्यापूर्वी संबंधित महापालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर काही व्यवस्थापनाकडून कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी न देता एक दिवसाचे जादा काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या असल्याबाबत वृत्तपत्रातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची भरपाई करून घेऊ नये.
संबंधित आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध भारत निवडणूक आयोग तसेच शासनाने विहित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास संबंधितांनी अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा adclpune@gmail.com dyclpune2021@ gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा विभागाचे अधीक्षक चि. भि. केंगले, यांच्या भ्रमणध्वनी क्र. ८७९६६७५०८९ वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त गीते यांनी केले आहे. या आदेशामुळे कोणत्याही आस्थापनाला आपल्या कर्मचाऱ्यांकडून मतदानाची सुट्टी भरुन घेता येणार नाही.
शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस सुट्टी येत असल्याने काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचे तर काही कंपन्यांनी पुढील साप्ताहिक सुटीच्या दिवशी कामावर येण्याचे तोंडी निर्देश कर्मचाऱ्यांना दिले होते.











