- अन्यथा आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने घटत आहे. धरणात शुक्रवारी (दि.१७) पर्यंत २८ टक्के पाणीसाठा होता. उकाड्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच, उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे.
उपलब्ध पाणीसाठा महिनाभर पुरेल इतका आहे. मात्र, पावसाने दडी मारल्यास पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायत व नगरपरिषदेला पाणी दिले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेस सर्वाधिक ५१३ एमएलडी पाणी दिले जाते. पवना नदीच्या रावेत येथील बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलून ते शुद्ध करून संपूर्ण शहराला पुरविते.
गेल्या साडेचार वर्षापासून पिंपरी-चिंचवडला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी ऐन उन्हाळ्यात वाढल्या आहेत. असे असताना, पवना धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत आहे. सध्या धरणात २८ टक्के पाणीसाठा आहे. ते पाणी महिनाभर म्हणजे येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्यास शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने आंद्रा धरणात दररोज ८० एमएलडी पाणी घेतले जाते. निघोजे येथून पाणी उचलून ते चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्या भागांत पुरविले जात आहे. आंद्रा धरणात अखेर २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.












