- अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला होणार जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- राज्यातील ३९० तंत्रनिकेतनांतील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून (२९ मे) सुरू होणार आहे. १ लाख ५ हजार जागांसाठी विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत अर्ज भरता येणार असून, अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला जाहीर केली जाणार आहे. प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबवल्या जाणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
वेळापत्रकानुसार नोंदणी आणि अर्ज करणे, कागदपत्र पडताळणी करण्यासाठी २९ मे ते २५ जूनची मुदत देण्यात आली आहे. २७ जूनला प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २८ ते ३० जून या कालावधीत गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवता येतील. तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला प्रदर्शित हकेली जाणार आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन फेऱ्या होणार आहेत. छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई छाननी प्रक्रियाही राबवली जाणार आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३१६ सुविधा केंद्रे, मार्गदर्शनसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वय अधिकारी उपलब्ध आहेत. पदविका प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.