- महिन्याभरात अधिकृत नकाशा उपलब्ध होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- शहरातील रेडझोन हद्दीच्या मोजणीचे काम राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सुरू केले आहे. सॅटेलाईट इमेजद्वारे ती अचूक मोजणी करण्यात येत आहे. हे काम आठवडाभर चालणार आहे. त्यानंतर रेडझोनची अचूक आणि स्पष्ट सीमा असलेला अधिकृत नकाशा उपलब्ध होणार आहे.
शहरात तळवडे, निगडी, त्रिवेणीनगर, रूपीनगर, यमुनानगर, रावेत, किवळे, चिखली, दिघी, भोसरी, वडमुखवाडी, च-होली, डुडुळगाव, बोपखेल हा परिसर रेडझोनने बाधित आहे. तसेच, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी या भागांना लागूनही लष्करी आस्थापना आहेत.
देहुरोड ऑर्डनन्स फॅक्टरी डेपो आणि दिघी मॅगझिन डेपोमुळे रेडझोन क्षेत्र जाहीर केले आहे. त्याच्या हद्दीत जागा मालकांना बांधकाम करता येत नाही. परिणामी, हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून २ हजार यार्ड (१.८२ किलोमीटर) परिघात रेडझोनची हद्द आहे. दिघी मॅगझिन डेपोपासून १ हजार १४५ मीटर रेडझोन हद्द आहे. त्या परिघात कोणतेही बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे शहरातील लाखो कुटुंबे प्रभावित आहेत.
रेडझोनची सीमा अस्पष्ट असल्याने मोजणी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर, त्या मोजणीस संरक्षण विभागाने परवानगी दिली आहे. मोजणीसाठी महापालिकेने भूमी अभिलेख विभागाकडे एकूण १ कोटी १३ लाख ६७ हजार ३०० रुपये शुल्क भरले आहे. भूमी अभिलेख विभागाकडून सॅटेलाईट इमेजद्वारे मोजणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. देहूरोड व दिघी डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून निश्चित केलेल्या हद्दीपर्यंत ही मोजणी केली जात आहे. या मोजणीत सर्व मालमत्ता, बांधकामे, मोकळी जागा, रस्ते, झाडे व इतर संसाधन असे सर्व बाबी चित्रीत होणार आहेत. मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी दगड लावण्यात येणार आहे. त्यावर रेखांकन केले जाणार आहे. महापालिका हे काम करणार आहे. त्यासाठी संरक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे.
महिन्याभरात नकाशा उपलब्ध होईल…
रेडझोन हद्द मोजणीस राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून सुरुवात झाली आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर महिन्याभरात पालिकेस रेडझोनचा अचूक नकाशा उपलब्ध होईल. त्यातून रेडझोनची सीमा निश्चित होणार आहे, असे पालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी सांगितले.