- मावळच्या जनतेचे आभार – खा. श्रीरंग बारणे…
- कार्यकर्त्यांकडून विजयी गुलाल उधळत मतदान केंद्राबाहेर विजयोत्सव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जून २०२४) :- मावळातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा उर्फ बारणे हे एकविसाव्या फेरीअखेर सुमारे ९६ हजार ९३४ मतांनी आघाडीवर आहेत. अजून चार फेऱ्या बाकी आहेत. तरीही प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.
एकविसाव्या फेरी अंती श्रीरंग बारणे (महायुती) यांना ६,२१,९८५ तर, संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) यांना ५,२५,०५१ मते मिळाली आहेत.
दरम्यान बारणे यांच्या विजयाचा आत्मविश्वास दुणावल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळत मतदान केंद्राबाहेर विजयोत्सव सुरु केला आहे. त्यामुळे मावळात बारणे यांची हॅट्रिक झाली आहे. दरम्यान विजयाची चाहूल लागताच श्रीरंग बारणे आणि त्यांचा मुलगा विश्वजित बारणे हे दोघेही बालेवाडी येथील मतदान केंद्रात दाखल झाले. कार्यकर्त्यांनी त्यांना पेढे भरवले.
प्रतिक्रिया देताना बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघातील लोकांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला. मला काम करण्याची संधी दिली. मावळच्या जनतेचे आभार मानतो. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी एका मिडिया माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
मतमोजणी केंद्राजवळ बारणे यांचा विजय निश्चित झाला, असे मानून त्यांचे समर्थक जल्लोष करीत आहेत. ठिकठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते फटाके वाजवून, गुलाल उधळत घोषणा देत आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आज सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. सुरूवातीच्या काही फे-यांमध्ये बारणे व संजोग वाघेरे यांच्यात चुरस झाली. मात्र, त्यानंतर बारणे यांनी आघाड़ी घेतली. बारणे यांचा विजय होणार, हे शिवसेना कार्यकर्त्यांना निश्चित वाटू लागले. त्यानंतर बारणे यांनी देखील मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश केला. मतमोजणीच्या संपुर्ण फे-या पुर्ण होण्यापुर्वीच त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवत, गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केला आहे.
दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार बारणे यांनी गतवेळी सुमारे दीड लाखांची आघाडी घेत विजयाचा झेंडा फडकवला होता.