न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- मावळ लोकसभा मतदार संघातील १६ हजार ७६० नागरिकांनी नोटाला पसंती दिली. त्यातील ३१ मते ही पोस्टल मते होती. तर, एकूण मतदारांच्या टक्केवारीमध्ये १.१८ टक्के नागरिकांनी ३३ पैकी आपल्यासाठी एकही उमेदवार योग्य नसल्याचे मत नोंदविले आहे.
मावळ लोकसभेसाठी एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील मुख्य लढत ही दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये झाली. त्यात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले. यंदा १४ लाख १९ हजार ४०१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यातील १६ हजार ७२९ व पोस्टल मतदानात ३१ अशा एकूण १६ हजार ७६० जणांनी सर्वच उमेदवारांना नाकारले.
एकूण मतदारांच्या टक्केवारीमध्ये हे १.१८ टक्के होते. विविध नागरी समस्या तसेच पर्यावरणाच्या मुद्दयावर काही नागरिकांनी मतदानच करणार नाही, असेही जाहीर केले होते. विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सुमारे एक टक्के मतदारांनी नोटाला पसंती दिली.